THIS SITE IS BEST VIEWED IN GOOGLE CHROME....................................................NOTE: Copyright Issues - Any image on this blog showing Blog's name or Blog address is not claimed to be created by the Blog's author unless otherwise specified.These images have been acquired from the web and Bha Bha Blogsghip bears no copyrights of these images.If you have any objection over any image or content please e-mail to bharatrbh@yahoo.com.

Monday, July 11, 2011

श्रीविठ्ठल आणि शासकीय महापूजा

अरुण पुराणिक - सोमवार, ११ जुलै २०११ 


इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत होते.१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ मध्ये शासकीय पूजा झाली नाही.  बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवणी आणि किस्से..
श्रीविठ्ठलाची महापूजा शिवछत्रपतींच्या काळापासून चालू झाली , असा एक समज आहे; पण त्याविषयी पुरावा नाही. श्रीक्षेत्र पंढरपूर हे विजापूरच्या आदिलशाहीत होते. थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे पुरावे आहेत. पुढे पंढरपूर पेशवाईत आले, तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत. देवस्थान समितीचे सदस्य आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा करत. १८३९ मध्ये ही पूजा करण्याचा मान सातारच्या गादीकडे होता. इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षांला दोन हजार रुपयांचे अनुदान देत असे. स्वातंत्र्योत्तर काळातही पहिली काही वर्षे हे शासकीय अधिकारीच पांडुरंगाची पूजा करीत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील, महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपुरी आले होते. त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.
१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ साली शासकीय पूजा झाली नाही. १९७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. लोक आपली शेतीवाडी, गुरेढोरे सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले. वारकरी म्हणू लागले, सरकारने पूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घातले. त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू केली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवणी आणि किस्से..
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आषाढी यात्रेच्या पूजेला पंढरपुरी आले होते. तेव्हा पांडुरंगासमोर दक्षिणेच्या रूपांत त्यांना मागणं मागितलं. ‘गरीब भाविक यात्रेकरूंना द्यावा लागणारा, जिझिया कर (यात्रा कर) रद्द करा.’ त्याप्रमाणे दादांनी नुसता पंढरपूरचाच नाही तर देहू-आळंदी येथीलही कर रद्द केला. ही पांडुरंगाच्या महापूजेची किमया!
महाराष्ट्राचे एक माजी गृहमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेस पहाटे अडीच वाजता आले. खाली सोवळे वर खादीचा सदरा! रात्रीची बहुधा उतरली नव्हती, जीभ अडखळत होती. दक्षिणेसाठी खिशांत हात घातला तर खिसा रिकामा! त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दम देऊन दक्षिणा देण्यास लावली. रुक्मिणी मातेच्या पूजेस आल्यावर पुन्हा दक्षिणेचा प्रश्न आला. आता जिल्हाधिकाऱ्याकडेही पैसे नव्हते. त्यांनी ‘उत्पात’ समितीच्या कार्यालयातून पैसे घेऊन देवीसमोर ठेवले.
शरद पवार मूळचे समाजवादी असल्याने नास्तिक होते. पंढरपूरच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला येत, पण देवळात येत नसत. पत्नीने फारच आग्रह केल्यावर केवळ तिच्या आग्रहासाठी ते एकदा विठ्ठल मंदिरात आले. पत्नी मनोभावे पूजा करत होती. बाहेरच्या हत्ती दरवाजातील कट्टय़ावर बसून शरदराव कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते. पत्रकारांनी खवचटपणे विचारले, तुम्ही देव मानीत नाहीत, तर मग पांडुरंगाच्या पूजेला कसे काय आलात? राजकारणात मुरलेल्या पवारांनी लगेच, हजरजबाबी उत्तर दिले, ‘माझ्या महाराष्ट्राची कोटय़वधी जनता पांडुरंगास देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे.’
एक ‘कर्मठ’ ब्राह्मण मंत्री आषाढीला महापूजेसाठी आले होते. घाईघाईत कशीबशी त्यांनी महापूजा उरकली. त्या दिवशी एकादशी असल्याने पंढरपुरात मांसाहार मिळणार नाही हे समजल्यावर त्यांनी तडक सोलापूर गाठले आणि दुपारचे मांसाहारी भोजन तिथे उरकले. याउलट इंदिरा गांधी सत्तेतून पायउतार झाल्यावर साधारण १९७९-८० च्या दरम्यान पहाटे चार वाजता पंढरपूरला आल्या. अंबाबाईच्या पटांगणातील पहाटेची भव्य सभा उरकली आणि पहाटे स्नान करून विठ्ठल मंदिरात पूजेला बसल्या. दर्शन, पूजाअर्चा करून डाक बंगल्यावर आल्या. टेबलावरती नाश्त्याची जय्यत तयारी होती. त्यात नेहमीचे पदार्थ आणि उकडलेली अंडी होती. पांडुरंगराव डिंगरे, पंढरपूरचे माजी आमदार आणि इंदिराजींचे भक्त, त्यांनी विनंती केली, मॅडम, आज एकादशी आहे आणि हे पांडुरंगाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा आजच्या दिवशी तरी हे अन्न तुम्ही घेऊ नका. त्या लगेच होय म्हणाल्या आणि फक्त दूध घेऊन तडक पुढच्या दौऱ्याला निघाल्या.
मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पूजेस आले, तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती होती. जुलै महिना अर्धा झाला तरी पाऊस पडला नव्हता. त्यांनी पांडुरंगासमोर हात जोडून विनवणी केली. ‘बा पाडुरंगा, महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे.’ देवस्थान समितीला विनंती केली, ‘शासकीय महापूजेचा कालावधी कमी करा, वारक ऱ्यांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागते याची जाणीव ठेवा.’ आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, ही प्रथा मनोहर जोशी यांच्या काळातच चालू झाली.
शालिनीताई पाटील एकदा पंढरपुरी पूजेला आल्या होत्या, तेव्हा, मनोभावे त्यांनी रुक्मिणी मातेला नवस केला. ‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण  दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’  चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा, दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला. पण त्यानंतर नवस करूनही त्या स्वत: मात्र कधी मुख्यमंत्री झाल्या नाहीत.
१९५३ मध्ये, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंढरपुरला आले होते. दर्शनाला जाताना, विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या दगडी उंबरठय़ावर ते जोरात ठेचकाळले. एक अशुभ घटना म्हणून पुढील काळांत तो दगडी उंबरठाच काढून टाकण्यात आला. रुक्मिणी मातेच्या मंदिरात मात्र तो दगडी उंबरठा अजूनही आहे.
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सवरेदय संमेलनासाठी १९५५ च्या दरम्यान पंढरपूरला आले होते. गावात प्रवेश केल्यावर, डाक बंगल्यावर न जाता, सरळ स्नानासाठी ते चंद्रभागा नदीच्या तीरावर गेले. सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. कुठून तरी चादरी, धोतरे आणून त्यांच्या भोवती आडोसा केला गेला. चंद्रभागेच्या पात्रातून अनवाणी चालत, वाळवंट, महाद्वार घाट, नामदेव पायरी ओलांडून ते विठ्ठल मंदिराच्या मंडपात आले. एका दमात चालत आल्यामुळे त्यांना किंचित धाप लागली म्हणून एखाद्या वारकऱ्यासारखे तिथल्या दगडी कट्टय़ावर बसले. काहीक्षण विश्रांती घेऊन, तिथून पूजेकरता देवाच्या गाभाऱ्यात गेले. पूजा चालू असताना तेथील ब्राह्मणांच्या बरोबरीने ते स्वत: मंत्र म्हणू लागले. पूजा झाल्यावर ते इतके संतुष्ट झाले की तेथील बडव्यांना त्यांनी विनंती केली, की माझी पत्नी पंढरपूरला येईल तेव्हा तिच्या हातूनही अशीच पूजा करा. त्याप्रमाणे महिनाभरांत त्यांच्या पत्नी पूजा करून गेल्या.
राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे संत नामदेव जन्मसप्तशताब्दीनिमित्त पंढरपूरला आले. ते प्रथम चंद्रभागेच्या काठावरील नामदेव मंदिरात गेले. तेथील नामदास महाराज हे संत नामदेवांचे वंशज आहेत हे सांगितल्यावर ते नामदास महाराजांच्या पाया पडले. नंतर महाद्वारातून संत नामदेव पायरीशी आल्यावर त्यांनी देवळाच्या दरवाजात, नामदेव पायरीला साष्टांग दंडवत घातला. पंजाबी आणि शीख बांधवांना संत नामदेव यांच्याविषयी किती आदर आहे, याचे त्याक्षणी प्रत्यंतर आले. त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. तेव्हा विठ्ठलासमोर दक्षिणा म्हणून तात्यासाहेब डिंगरे यांनी त्यांच्याकडे एकच मागणे मागितले, ‘बार्शीलाईट रेल्वे ब्रॉडगेज करा व अमृतसर-पंढरपूर अशी नानक-नामदेव एक्सप्रेस चालू करा.’ त्यावर ते प्रसन्नपणे हसले.
राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा हे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती असताना किमान तीनचार वेळा पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले. त्यांच्यामुळे पंढरपूरची रेल्वे ब्रॉडगेज झाली. यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री असताना पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले होते.
१९८५ साली, शिवसेनेचे महाडचे अधिवेशन झाल्यावर, सोलापूर जिल्हा, शिवसेना संपर्कप्रमुख राम भंकाळ यांना घेऊन मी शिवसेनाप्रमुखांना पंढरपूर भेटीचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. तेव्हा देशात घातपाताचे प्रकार चालू होते. शिवसेनाप्रमुख उद्वेगाने म्हणाले, ‘तुझ्या त्या पांडुरंगाला माझा निरोप दे’ डोळे मिटून कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस? हाती जोडा घे आणि धर्माध शक्तींना पार चिरडून टाक!’ नंतर तेही पंढरपुरी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन आले.
चंद्रशेखर सरस्वती आणि कांचीकामकोटीपीठाचे परम आचार्य आणि श्री सत्य साईबाबाही विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरी आले होते. आचार्य विनोबा भावे सर्वधर्मीयांना घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून ते ओक्साबोक्शी रडू लागले. क्षणभर तिथे स्तब्धता पसरली. लोकांनी विचारले, आचार्य, तुम्ही असे का रडता? रडवेल्या आवाजातच ते म्हणाले, ‘ज्या पायांवर संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत नामदेव, एकनाथ, तुकारामांनी डोके टेकविले, त्या पायांवर मी आज डोके टेकवित आहे. हे माझे किती जन्मांचे भाग्य आहे याची तुम्हाला कल्पना नाही! हे माझे आनंदाश्रू आहेत.’
पूर्वी बाळासाहेब भारदे, शशिकांत पागे यासारखी वारकरी संप्रदायाची, आध्यात्मिक क्षेत्राची जाण असलेली मंडळी मंदिर समितीवर होती. आजकाल राजकीय नेमणुका केल्या जातात. आषाढी कार्तिकीला पूजेला येणे भावनेपेक्षा प्रतिष्ठेचे लक्षण बनत चालले आहे. २००९ मध्ये शासनाने पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी कशी केली जाते, ते पाहणे महत्त्वाचे आहे. नैतिक मूल्ये जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांची ही अतिशय बोलकी दोन उदाहरणे-
शंकरराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री असताना, आषाढीवारीच्या पौर्णिमेनंतर विठ्ठलाच्या दर्शनास आले. त्यांना पूजा करायची होती, पण प्रशाळ पूजा झाल्याशिवाय मंदिरात महापूजा करता येत नाही ही येथील परंपरा आहे. हे त्यांना सांगितल्यावर ‘माझ्यासाठी तुम्ही नियम मोडू नका, मी फक्त दर्शन घेऊन परत जातो’ म्हणाले व त्याप्रमाणे ते नुसते दर्शन घेऊन परत गेले.
पंडित लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना बार्शीलाईट रेल्वेने पंढरपुरी आले. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेण्याची इच्छा होती, पण वारी असल्याने रेल्वे स्टेशनवर कॉलऱ्याची लस टोचून घेतल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नव्हता. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. तेव्ही मी हे इंजेक्शन घेणार नाही. तेव्हा अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही केंद्रीय मंत्री! तुम्हाला इथे कोण अडविणार?’ तेव्हा शास्त्री म्हणाले, ‘मी इंजेक्शन घेणार नाही आणि मंत्री असलो तरी इथला नियम मोडणार नाही.’ ते पांडुरंगाचे दर्शन न घेता चक्क पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून परत गेले.
आषाढीवारीच्या निमित्ताने, पांडुरंगाच्या साक्षीने, आपण सर्वानीच यातून नैतिकतेचा बोध घेण्याची गरज आहे, असे मला प्रकर्षांने वाटते!

No comments:

Post a Comment

Feel Free to Comment

Top 5 Popular Posts